वाटूळ : कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी अनेकदा निवेदने, आझाद मैदानात आंदोलने करूनही शासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडलेले नाही. १०/१५ वर्षे विनावेतन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने हतबल झालेल्या शिक्षकांनी शिक्षकदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षण संचालक आणि शिक्षक आमदारांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २००३ ते २०११ दरम्यानची व्यपगत पदे, २०१०/११ पूर्वीची उपसंचालक कार्यालयातील नजरचुकीने मान्यता राहिलेली वाढीव पदे आणि २०११ पासूनची वाढीव पदे अशा एकूण १२९८ पदांचा प्रस्ताव मागील अनेक वर्षे शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या पदांवर कार्यरत शिक्षकांना मागील १०/१५ वर्षे पूर्णतः विनावेतन काम करताना एकेक दिवस कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे. आपल्या पदांना मान्यता मिळेल या भोळ्या आशेवर हे शिक्षक विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करीत आहेत.
शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवून मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये होत असलेल्या वेळकाढूपणाला कंटाळून हतबल झालेल्या वाढीव पदावरील शिक्षकांनी २६ जुलै रोजी संचालक कार्यालयात एकत्र येऊन १५ ऑगस्ट रोजी आपल्या समस्येकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे, तसेच दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढीव पदांना मान्यता मिळाली नाही, तर दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिनी वाढीव पदावरील शिक्षक नाइलाजाने आत्मदहन करणार असल्याचे म्हटले आहे. या अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाने त्वरित वाढीव पदांना मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षकांनी केली आहे