रत्नागिरी : कोकण रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांची काेविड तपासणी करण्यात येत नसल्याची ओरड गुरुवारी करण्यात आली हाेती. त्यानंतर कोविड तपासणीच्या नियोजनाबाबत शुक्रवारी सकाळी आढावा घेण्यात आला. याठिकाणी २४ तास एक पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, कोकण रेल्वे प्रादेशिक व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये उपस्थित होते. प्रादेशिक व्यवस्थापक शेंड्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येबाबतची माहिती आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेकडून घेणार आहेत. सर्व प्रवाशांची कोविड तपासणी रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्येच करण्यात येणार आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तपासणी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. त्यासाठी ३ कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी व २ इतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक रेल्वे स्थानकावर २४ तास कार्यरत असणार आहे.
येणाऱ्या प्रवाशांपैकी जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून, उर्वरित प्रवाशांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जाखड यांनी दिली आहे.