राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व पावसामुळे घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या चक्रीवादळात तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.
राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील घराची भिंत कोसळून अनिल तुळाजी मासये (वय ४२), अस्मिल अनिल मासये (३६) व मुलगी श्रावणी अनिल मासये (१३) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळात आंबोळगड येथील मठाचे, कशेळी येथील मनोज मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील भाई काजवे यांच्या घरावर झाड कोसळले. आडिवरे वेत्ये मार्गावर झाड पडून रस्ता बंद झाला होता. आंबोळगड येथील वाडेकर यांच्या गोठ्यावर झाड काेसळले. साखरीनाटे येथील शरफुद्दीन वाडकर यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. कारिवणे येथील गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळली आहे. नाटे येथील संदेश पाथरे यांच्या जिमचे नुकसान झाले आहे. दळे येथे सुधाकर कृष्णा गिरकर यांच्या गोठ्यावर झाड पडले. जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घरावरही झाड पडून नुकसान झाले आहे. सागवे हमदारेवाडी येथील पटेल बंधूच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. जैतापूर परिसरात माेठ्या प्रमाणात माड पडून काही ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.
कारिवणे भागात घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. दळे, होळी, तुळसुंदे या भागातही घरांची पडझड होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, तर जैतापूर, कुवेशी, होळी, माडबन, तुळसुंदे यांसह अन्य भागांत वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. कशेळी, वाडापेठ, नाटे, अणसुरे, जैतापूर व अन्य भागांत आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.
महावितरणला तडाखा
चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत होता. उच्च दाब वाहिनेचे सुमारे ५० ते ६० वीजखांब पडले असून, लघु दाब वाहिनेचे सुमारे १०० पोल पडले आहेत. राजापूर, पडवे व धारतळे हे वीज ट्राॅन्सफार्मर बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, पाचल, ओणी, हातिवले या भागातही वादळाचा फटका महावितरणला बसला असून संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे राजापूर कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्यासह राजापूर ग्रामीणचे कुलदीप गायकवाड, आडिवरेचे शौन चांदोरकर, भूषण आघम आदींसह अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.
या चक्रीवादळ काळात २४ तास नियंत्रण कक्षात तहसीलदार प्रतिभा वराळे कार्यरत हाेत्या़ प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे धैर्य वाढवतानाच जनतेलाही विश्वास दिला. गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वादळात चांगली कामगिरी बजावली आहे.