चिपळूण : उपनगर वगळता शहर हद्दीत एकमेव असलेल्या रामतीर्थ स्मशानभूमीतील शेड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. या शेडसाठी तिसऱ्यांदा काढलेल्या फेरनिविदेलाही मंगळवारी एकाच ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला. अखेर या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संबंधित ठेकेदाराच्या निविदेचा प्रशासनाकडून विचार होण्याची शक्यता आहे.
शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत सध्या कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. नगर परिषदेने रामतीर्थ स्मशानभूमी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामदेव श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टला दिली आहे. सद्य:स्थितीत रामतीर्थ स्मशानभूमीतील पत्र्याची शेड काढण्यात आली आहे. पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच मृतदेहाला अग्नी दिलेला असतानाच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने रामतीर्थ स्मशानभूमीतील पत्र्याच्या शेडसाठी तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऑनलाइन पद्धतीने राबविलेल्या या निविदेला एकाच ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला होता. तरीही नगर परिषद अधिनियमानुसार तीन वेळा फेरनिविदा काढल्यानंतर एक ठेकेदार असल्यास व त्याचा दर अंदाजपत्रकानुसार असल्यास निविदा स्वीकारता येते. त्यानुसार संबंधित ठेकेदाराचे दर व कागदपत्र तपासण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
---------------------
रामतीर्थ स्मशानभूमीच्या शेडचे काम कोरोना परिस्थितीत तातडीने होणे आवश्यक आहे. तिसऱ्यांदा निविदा काढल्यामुळे आता नियमानुसार एका ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला तरी ती स्वीकारता येते. मात्र त्यासाठी कागदपत्रे परिपूर्ण असणे गरजेचे आहे. तेव्हा या ठेकेदाराची निविदा परिपूर्ण असल्यास तातडीने कामाचे आदेश देण्यात येतील.
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण नगर परिषद