रत्नागिरी : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बारावीच्या परीक्षा मे महिन्यात, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अभ्यासाचे दिवस वाढल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. दि. २३ एप्रिलपासून बारावी व दि. २९ एप्रिलपासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले होते. कोकण विभागीय मंडळाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी नियमित २१ हजार ३७८, तर ४०९ पुनर्परीक्षार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. तसेच बारावी परीक्षेसाठी १७ हजार ६७६ नियमित व ४०९ पुनर्परीक्षार्थी बसणार आहेत. दहावीसाठी ७३, तर बारावीसाठी ३७ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. शिवाय सात भरारी पथक परीक्षा काळात परीक्षा केंद्रांना भेट देऊन लक्ष ठेवणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावीसाठी नियमित १०,२०१, तर १५१ पुनर्परीक्षार्थी तसेच बारावीसाठी ९,६९४ नियमित आणि १६३ पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत.
यावर्षी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रथम सत्रापर्यंत शाळांचे ऑनलाईन अध्यापन झाले. सहामाई परीक्षाही ऑनलाईन झाल्या. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. अवधी कमी असल्याने २५ टक्के अभ्यासक्रम शासनाने वगळला आहे. मोजक्या वेळेत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर करण्यात आली. शाळांनीही मार्चमध्ये विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेऊन मुलांना अभ्यासासाठी सुट्ट्या दिल्या होत्या. मात्र कोरोना रुग्णवाढीमुळे पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर गुणांकन देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच दहावी, बारावीच्या परीक्षा एक महिना आणखी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मुले व त्यांच्या पालकांना परीक्षेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे मुलांचा अभ्यासाकडील कल हळूहळू कमी होणार आहे. शिवाय कोरोना संकटकाळात पालकांना मुलांकडे लक्ष ठेवून सतत मुलांच्या मागे अभ्यासासाठी मागे लागावे लागणार आहे.
..................
कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. दहावी बारावीसाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तेथे होणारी गर्दी व बैठक व्यवस्थेचे नियोजन टाळण्यासाठी परीक्षा शाळास्तरावर घेण्याच्या सूचना केल्या, तर परीक्षा वेळेवर होतील व पालकही निर्धास्त राहतील.
- प्रज्ञा पवार, पालक
.....................
परीक्षा मे/जूनमध्ये घेण्यात येणार असल्या, तरी नव्याने वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे, हा पर्याय नाही. त्याऐवजी शासनाने परीक्षा घेण्याबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
- साक्षी खेडेकर, पालक