खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणमार्गावरील चाकरमान्यांच्या वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वेस्थानकांत तैनात केलेले विशेष कृती दलाचे जवान आता आपल्या मुख्यालयात परतले आहेत. रेल्वे प्रशासनाने ४ सप्टेंबरपासून रेल्वेच्या विशेष कृती दलाची कुमक त्या-त्या स्थानकात तैनात केली होती. गेले १८ दिवस ड्युटी बजावणाऱ्या विशेष कृतीदलाच्या मदतीला स्थानिक पोलीस व गृहरक्षकदलाचे जवानही होते.
गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी येण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, प्रशासनाने यावर्षी रेल्वे प्रवासात काही अटी व शर्ती ठेवून चाकरमान्यांना प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली. या संधीचा लाभ घेत चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी गावी येणे पसंत केले होते. रेल्वे प्रशासनानेही गणेशोत्सवासाठी तब्बल २२४ गणपती स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकांवर १०० हून अधिक रेल्वे सुरक्षा बल तैनात होते. शस्त्रधारी पोलिसांमुळे गणेशभक्तांनाही दिलासा मिळाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात होता. यासाठी दिवसरात्र विशेष कृती दलाने व्यवस्था बजावली. रेल्वेस्थानकात विशेष कृती दलाच्या दिमतीला स्थानिक पोलीस व गृहरक्षकदलही होते.
कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच गणपती स्पेशल गाड्या तूर्तास बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची रेल्वेस्थानकात गर्दी कमी झाली आहे. कोकण मार्गावरील विविध रेल्वेस्थानकांत सलग १८ दिवस तळ ठोकत जागता पहारा देणाऱ्या विशेष कृती दलाची सेवाही संपुष्टात आल्याने त्यांनीही परतीची वाट धरली. रेल्वेस्थानकात तैनात आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनीही तपासणीवर भर दिल्याने कोरोना नियंत्रणात राहण्यास तितकीच मदत झाली. मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक पोलिसांच्या बंदोबस्तालाही पूर्णविराम मिळाला. महामार्गावर वाहतूककोंडी होऊन चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी २५ हून अधिक वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी गणेशोत्सव कालावधीत दिवसरात्र ड्युटी बजावली.