खेड : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने खेडमध्ये मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पुढे येत आहे. त्याचवेळी शिवसेनेतून इच्छुक म्हणून बिपीन पाटणे, मिनार चिखले, मिलिंद इवलेकर, नागेश तोडकरी ही नावेही नगराध्यक्ष निवडणुकीसाठी चर्चेत असल्याने ही निवडणूक चुरशीची तसेच लक्षवेधक ठरणार आहे.खेड नगराध्यक्ष पदासाठी शहरात सर्वच पक्षात अनेक मातब्बर इच्छुक आहेत. खेड नगर परिषदेत सध्या १७ नगरसेवक आहेत. यातील १५ नगरसेवक निवडणुकीद्वारे निवडून आले आहेत, तर दोन नगरसेवक स्वीकृत आहेत. मनसेचे आठ, राष्ट्रवादीचा एक, तर शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत. उर्वरित दोन स्वीकृ त नगरसेवक मनसेचे आहेत. विद्यमान नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बिपीन पाटणे यांचा समावेश आहे. पाटणे यांनी तीनवेळा नगरसेवकपद व एकवेळा नगराध्यक्ष पद सांभाळले आहे. त्यांचा नगरपरिषदेतील अनुभव लक्षात घेता शिवसेनेच्यावतीने त्यांना थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याकरिता संधी मिळू शकते. मात्र, शिवसेनेतर्फे विद्यमान नगरसेवक मिनार चिखले हेदेखील या पदासाठी इच्छुक आहेत. पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या प्रभागात वैयक्तिक पातळीवर कामे केली आहेत. याबरोबरच शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मिलिंद इवलेकर आणि माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी हेदेखील इच्छुक असल्याचे समोर आले आहे. सेनेतील या चार दिग्गजांच्या उमेदवारीच्या शक्यतेने शिवसेनेत काहीशी संघर्षमय स्थिती निर्माण होणार आहे. मात्र, शहरातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करण्यात येणार असून, रामदास कदमांच्या उपस्थितीतच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेत माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांचेच नाव आघाडीवर आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांनी या निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली आहे. खेडेकर यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील अनेक आवश्यक असलेली विकासकामे मार्गी लावण्याकडे लक्ष पुरवले आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी आणि पथदीप आदी प्राथमिक गरजांकडे त्यांनी स्वत: लक्ष देऊन ही कामे तातडीने करुन घेतली आहेत. नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीत त्यांनी शिवसेनेप्रमाणे मनसेतील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेकांना मदतीचा हात दिला आहे. नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जाईल, अशी अनेक कामे त्यांनी गेल्या वर्षभरात केली असून, याचा लाभ त्यांना या निवडणुकीत मिळू शकतो. यामुळे शहरातील नागरिकही समाधानी आहेत. केलेल्या विकासकामांमुळे नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याला विजय मिळू शकतो, असा त्यांना विश्वास आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात थेट नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या नगण्य आहे. मात्र, तरीही ऐनवेळी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच सेना - भाजप युती होण्याची शक्यता धुसर झाली असून, भाजपतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. याकरिता माजी नगराध्यक्ष आ. बा. जोशी, अॅड. मिलिंद वाडकर यांच्या नावांची शहरात चर्चा आहे. (प्रतिनिधी)
खेडमध्ये दिग्गजांची कसोटी
By admin | Published: October 07, 2016 10:33 PM