लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या कोरोनाबाधित क्षेत्रातील कसबा आणि माभळे गावांतील वाड्यांमध्ये आरोग्य पथकाने कोरोना चाचण्या करण्यात सुरुवात केली आहे. थेट पोलीस बंदोबस्तात या चाचण्या घेण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाबाधित क्षेत्रांची घोषणा केल्यानंतर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
कोरोनाबाधित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच आणि व्यापारी यांची संगमेश्वर पोलीस स्थानकात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या अधिसूचनेचे वाचन करण्यात आले. यावेळी रुग्णसंख्या कमी असताना कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच रुग्णसंख्या शून्य होऊनही त्या गावांना कोरोनाबाधित क्षेत्र घाेषित केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या कसबा गावात आरोग्य पथकाच्या चार तुकड्या नेमून कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. कसबा गावात कोरोना तपासणीवेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस सचिन कामेरकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कसबा गावात एका दिवसात संध्याकाळपर्यंत ३०० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच माभळे काष्टेवाडीत घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर चाचण्या सुरू करण्यात आल्यानंतर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १५० चाचण्या घेण्यात आल्या.