मेहरुन नाकाडे
रत्त्नागिरी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परिषदेतर्फे भावी शिक्षकांसाठीपरीक्षा घेण्यात येते. वास्तविक कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेली परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा घेणाऱ्यांनीच पेपरफुटीचा घोळ घातल्याने भावी शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे.
शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची आहे. ही परीक्षा कोरोनामुळे दीड वर्ष लांबली. पेपर क्रमांक १ चे गणित व पेपर क्रमांक २ चे मानसशास्त्र कठीण होते. एकूणच परीक्षा घेताना काठिण्यपातळी राखली गेली. परीक्षेचा निकालही दोन ते तीन टक्के लावला जातो. त्यामुळे परीक्षा पास होणे हे दिव्य असल्याने विद्यार्थी त्याच्यासाठी अथक परिश्रम घेतात; परंतु पेपरफुटीचा घोटाळा बाहेर आल्यामुळे आतापर्यंत विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया गेले आहेत.
परीक्षा पध्दतीवरील विश्वास कमी होत आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी यापुढे परीक्षा द्यावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे परीक्षा पध्दतीच रद्द करून रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
दीड वर्षानंतर परीक्षा, त्यातही घाेळ
टीईटी परीक्षेत पेपरफुटीमधील घोटाळा उघडकीस आला असल्याने भविष्यात परीक्षा परिषदेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.
कोरोनामुळे लांबलेली परीक्षा गेल्या महिन्यात झाली; परंतु परीक्षेतील काठिण्यपातळी राखली गेली. गणित व मानसशास्त्र विषयातील प्रश्न कठीण असल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला होता.
जिल्ह्याचा विस्तार पाहता, दोन स्वतंत्र केंद्र ठेवण्याऐवजी एकच केंद्र ठेवले, त्यात उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पेपरला बसता आले नसल्याने नुकसान झाले.