मंदार गोयथळे- असगोली - उर्विमाला साहित्य नगरीतील मसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या कार्यक्रमात विद्यार्थी कवी व लेखकांच्या संवादाने चांगलीच रंगत आणली. यामधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध लेखक व कवी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. यावेळी इंद्रजीत भालेराव यांच्या इयत्ता पाचवीतील ‘बाप’ या कवितेमधून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील बाप खऱ्या अर्थाने उलगडला.साहित्य संमेलनात रविवार हा सुटीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये सुहास बारटक्के, इंद्रजीत भालेराव, अशोक बागवे, भास्कर बडे यांच्यासारख्या कवी, लेखकांबरोबर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्येक कवी, लेखकाने पाठ्यपुस्तकातील आपली कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. प्रा. सुहास बारटक्के यांनी आपली पाठ्यपुस्तकातील कविता विद्यार्थ्यांसमोर सादर करत आपल्या लेखनात कोकणच्या निसर्गसौंदर्याला अधिक महत्त्व देण्यात आल्याचे सांगितले. कोकणातील माणसे, निसर्ग, पाहण्यासारखे आहे आणि याच कोकणावर मी खूप काही लिहिले. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हीदेखील या निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून लेखनीला सुरुवात करा. यातूनच भविष्यात तुमच्यातील मोठा साहित्यिक निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.इंद्रजीत भालेराव यांनी आपला लेखन क्षेत्रातील प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडताना इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘बाप’ या कवितेतील खरा-खुरा बाप उलगडून दाखवला. शेतामधील माझी खोपटीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप...’ माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या माथी लिहिलेल्या कायमचा धंदा’ या त्यांच्या कवितेच्या ओळींनी शेतकऱ्याचे जीवनपट उलगडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भेटीला आलेल्या पाठ्यपुस्तकातील कवी, लेखकांशी प्रश्नोत्तराने थेट संवाद साधला. यामध्ये प्रश्न वैशाली कानसे इयत्ता अकरावी पाटपन्हाळे महाविद्यालय-काही कवी सुख- दु:खाचे, तर काही प्रेमाच्या कविता लिहितात, त्यांनी हे प्रसंग अनुभवलेले असतात का? यावर भास्कर बडे यांनी प्रत्येक कवी व लेखक हा घडणाऱ्या वास्तवाचा आधार घेऊनच कविता घडते. यामुळे कवी त्या प्रसंगातून काहीअंशी जातोच, असे उत्तर दिले. प्रश्न निवेदिता कोपरकर पालशेत विद्यालय - तुम्हाला तुमच्या घरी एक लेखक किंवा कवी म्हणून राहायला आवडते की, वडील म्हणून राहायला आवडते? प्रा. इंद्रजीत भालेराव - मला लिखाणामुळे घरी योग्य प्रमाणात वेळ देता आलेला नाही. त्यामुळे वडील ही भूमिका तितक्याशा चांगल्या प्रमाणात पार पाडता आलेली नाही. प्रश्न अनिकेत पवार, गुहागर महाविद्यालय, लिहिण्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार व तो कसा मिळतो? यावर ज्येष्ठ साहित्यिक व कवी अशोक बागवे म्हणाले की, वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद हाच पुरस्कार इतर पुरस्कारापेक्षा कवी व लेखकाला मोठा असतो. (वार्ताहर)
पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक भेटीला
By admin | Published: November 30, 2014 10:51 PM