Uddhav Thackeray Live: व्यक्ती विरोधी पक्षात असली की हा पापी आहे, हा गुन्हेगार आहे, भ्रष्टाचारी आहे. आज सर्वांत जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. कारण तुम्हीच सगळ्यांवर आरोप करून तुमच्या पक्षात घेतले आहे. पूर्वी एक जमाना होता, तेव्हा हिंदुत्वाचे पवित्र वातावरण होते. त्यावेळेस भाजपच्या व्यासपीठावर साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या शिवगर्जना जाहीर सभेत ते बोलत होते. राजन साळवी, वैभव नाईक यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या कुटुंबालाही चौकशीसाठी बोलावले आहे. राजन साळवी आज तुमच्या घरावर ते आलेले आहेत. उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल, याचा विचार त्यांनी करून ठेवावा, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.
जागतिक स्तरावर घोटाळा उघड झालाय, त्याची चौकशी आधी करा
राजन आणि वैभव यांची काय संपत्ती आहे, त्यापेक्षा जागतिक स्तरावर एक मोठा घोटाळा फुटला आहे, त्या तुलनेत यांची संपत्ती किती आहे, यांच्या मागे लागण्याआधी त्यांची चौकशी का करत नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. हे लोक परिवारवाद, घराणेशाहीवर बोलत असतात. होय, मी उद्धव ठाकरे अभिमानाने सांगतो की, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे की, ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबत आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यापूर्वी तुमची वंशावळी काय ते आम्हाला सांगा. एखाद्या कमिटीवर मुलाला बसवायचे आणि कुटुंब उद्धव करायची, घराणी उद्ध्वस्त करायची, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
दरम्यान, अलीकडेच पोटनिवडणुकांचे निकाल लागले. कसब्यात साफ झाले. चिंचवडमध्ये गद्दारी, बंडखोरी झाली नसती तर तेथेही यांचा सुफडा साफ झाला असता. अंधेरीमध्ये तर लढायची हिंमत झाली नाही, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच त्यांना भगवे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणुक आयोग नाही. चोरांना आशीर्वाद देणार का? मिंधेच्या हातात धनुष्यबाण पण मिंधेचा चेहरा पडलेला. मेरा खानदान चोर है हे कधीच पुसले जाणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"