'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:35 PM2024-01-29T12:35:21+5:302024-01-29T12:35:35+5:30
छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे.
मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर दिवाळी साजरी झाली. त्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यामध्ये आंदोलकांवरील गुन्हे, सगेसोयऱ्यांना आरक्षण आदी मुद्दे आहेत.
सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकत नोंदवण्याचे ठरले असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी छगन भुजबळांबाबत मोठा दावा केला आहे.
छगन भुजबळ जी भूमिका घेत आहेत. त्यामागे षडयंत्र आहे. छगन भुजबळसुद्धा थोड्या दिवसांमध्ये अजित पवार गटापासून दूर होणार आहेत. छगन भुजबळ कदाचित स्वतंत्र पक्ष देखील स्थापन करू शकतील. शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र नांदने शक्य नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊतांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच ओबीसी आणि मराठा समाजाने सरकार पासून सावध राहायला पाहिजे. जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आता भुजबळ यांनी राज्यात एल्गार यात्रेची घोषणा केली आहे. तसेच सगेसोयरे मसुद्याविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहनही केले आहे.
बाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडले पाहिजे- भुजबळ
आपण आपल्या मुला-बाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडले पाहिजे. यासाठी एक तारखेला आमदार किंवा खासदार आणि तहसिलदार यांच्याकडे ओबीसी आरक्षणाच्या बाचावाच्या मागण्या देतील. लाखोंच्या संख्येने ओबीसी बाहेर पडा. आमदार आणि खासदारांना आपण बोललं पाहिजे. मतदानासाठी त्यांनी ओबीसींची गरज आहे. आपण सगळ्यांनी त्या त्या मतदार संघातील आमदारांकडे जायचे आहे, असं आवाहन भुजबळ यांनी केले.