लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच मे महिन्यात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा निगेटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ४१०२ पॉझिटिव्ह रुग्ण आले, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९८१ आहे. ही बाब रत्नागिरी जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.
गतवर्षापासून कोरोना संसर्गाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. यात जिल्ह्यातील ८०४ जणांना जीव गमवावा लागला आहे. काही काळ गायब झालेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा उसळी घेतली आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पैलाव झपाट्याने होत आहे. या संसर्गाचे समूळ उच्चाटन करणाऱ्या प्रभावी औषधाची अजूनही निर्मिती झालेली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर योग्यरीत्या उपचार केला जात आहे. तरीही रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत, अशी परिस्थिती आहे. आरोग्य विभागाने कोविड चाचण्या वाढविल्या असल्याने संख्या वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यात दिसत आहे. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असतानाही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. लसीकरणावर आराेग्य विभागाने जास्त भर दिला आहे. पूर्वीपेक्षा लस घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याने लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २६,९६१ झाली असून, कोरोनावर मात करून आतापर्यंत १९,८४३ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ५,७५१ असून, ८०४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आठवडाभरात ४,९८१ रुग्ण बरे झाले असून, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
तारीख बरे झालेले रुग्ण
१ मे, २०२१ ७७१
२ मे ३७०
३ मे ३८६
४ मे ५२१
५ मे ६०१
६ मे ८७६
७ मे ७९६
८ मे ६५३
एप्रिलपेक्षा मे मध्ये आठवडाभरात जास्त रुग्ण बरे झाले
एप्रिल, मे महिन्यांत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती, तर त्यापेक्षा बरे झालेले रुग्ण कमी होते. एप्रिल २०२१ मध्ये महिन्याभराच्या कालावधीत ४,७५९ रुग्ण बरे झाले होते, तर त्यापेक्षा जास्त ४,९८१ रुग्ण मे महिन्यात दि. १ ते ८ तारखेच्या दरम्यान बरे झाले असून, ही संख्या जास्त असून जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.