हर्षल शिरोडकरखेड : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली असली तरी एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण मात्र अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरले आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर अनेकदा अपघात झाले आहेत.चौपदरीकरणाचे काम करताना भोस्ते घाटातील बहुतेक तीव्र व नागमोडी वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, घाटाच्या शेवटच्या टप्प्यात असलेले तीव्र उतार व यू इंग्रजी आकाराचे हे वळण या मार्गावरून नियमित मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांनासुद्धा धोकादायक ठरले आहे.भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी तब्बल पाचवेळा भूस्खलन झाले होते.आता या घाटात काही ठिकाणी दरड कापण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा वाहतूक करणारी मार्गिका सुरक्षित झाल्याचे दिसून येते. मात्र, भोस्ते घाटातील धोकादायक आणि तीव्र उतार असलेले हे यू आकाराचे वळण अजूनही अपघातग्रस्त ठिकाण बनले आहे. या वळणावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सुमारे शंभर मीटर अंतरावर तब्बल दहा मोठे मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत.मात्र, या अवघड वळणावर अपघात रोखण्यासाठी अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. यावर्षीही पावसाळ्यात या घाटातून जपूनच प्रवास करावा लागणार आहे.
Ratnagiri News: भोस्ते घाटातील ‘ते’ वळण अजूनही धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 12:47 PM