देवरूख : देवरूख क्रांती नगरमधील एका अपार्टमेंटमधील झालेल्या वृद्धेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणातील फिर्यादी आणि मृत वृद्धेचा मुलगा दीपक दत्तात्रय संसारे यालाच संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. शुक्रवारी देवरूख पोलिसांनी त्याला अटक करून देवरूख न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दीपकला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.क्रांतीनगर येथील शारदा दत्तात्रय संसारे या वृद्धेचा खून झाल्याची घटना ३१ ऑक्टोबरला घडली होती. डोक्यात घाव घालून हा खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. हा खून कोणी केला, का केला याबाबत उलटसुलट तर्क सुरू होते. ३१ रोजी (सोमवारी) रात्रीपासून तपास सुरू झाला. देवरूख पोलिसांसह अन्य तांत्रिक पथके आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे काम सुरू होते. श्वान पथकालाही येथे पाचारण करण्यात आले. मात्र, हे श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञ तसेच फॉरेन्सिक लॅबची व्हॅन दोन तीन दिवस देवरुखात तळ ठोकून होती.या खुनाची फिर्याद शारदा यांचा मुलगा दीपक यानेच दिली होती. आता शुक्रवारी दीपक यालाच संशयित आरोपी म्हणून देवरूख पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, कोणत्या माहितीमुळे ही अटक झाली, हे समजू शकलेले नाही. देवरूख न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बी. डी. तारे यांनी दीपकला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
Crime News: देवरुखातील वृद्धेच्या खूनप्रकरणी मुलालाच अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 5:01 PM