रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. असे नेमके किती गुन्हे आहेत, याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक लवकरच तयार करतील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मंत्री सामंत यांनी बारसू तसेच नाणार येथील आंदोलकांचे नेते तसेच ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. नाणारमध्ये होऊ घातलेल्या बॉक्साईट उत्खननाबाबत ही चर्चा होती. याचवेळी प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. जोपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत सरकार कोणताही प्रकल्प लादणार नाही, कसलीही बळजबरी केली जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सामंत यांनी पुन्हा एकदा मांडली.बारसूमध्ये झालेल्या आंदाेलनानंतर अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील जे गुन्हे राजकीय व सामाजिक विषयांसाठीचे आहेत, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. किती ग्रामस्थांवर, कोणत्या प्रकारचे, किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती काढण्याची सूचना आपण जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना केली आहे. त्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले.या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम, अमोल गोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.
रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By मनोज मुळ्ये | Published: August 09, 2024 6:32 PM