मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:21 PM2022-11-25T18:21:22+5:302022-11-25T18:21:48+5:30

काँग्रेस नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेना उधान

The Chief Minister visit is not a change of party, the Congress leader clarified his position | मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

संग्रहित फोटो

googlenewsNext

चिपळूण : राज्याचे मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना भेटणे म्हणजे पक्षांतर असे होत नाही. चिपळूणमधील काँग्रेस नगरसेवकांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट ही शहरातील समस्या व विकासासाठी होती. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. ते सर्वजण काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दात चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चिपळूणमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण यांनी सोमवारी (२१ नाेव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. बांधकाम व्यावसायिक नासिर खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत प्रदीर्घ चर्चाही झाली. साहजिकच या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले.

मात्र, ही भेट फक्त शहरातील विकासकामांसंदर्भात होती, असे त्या नगरसेवकांनीच स्पष्ट केले. तर आता काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनीही उघडपणे प्रतिक्रिया देत या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोणताही सामान्य माणूस भेटू शकतो. ते राज्याचे पालक आहेत. मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात, तर ते राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येबाबत त्यांना भेटणे अजिबात गैर नाही, असेही लियाकत शहा यांनी सांगितले.

चिपळूणमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे सत्य असले, तरी ते फक्त आणि फक्त चिपळूण शहरातील समस्या आणि विकासकामांबाबत भेटले आणि चर्चा केली. त्याचा अर्थ त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असा होत नाही. सुधीर शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण हे सर्वजण काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. यापूर्वी आलेल्या अनेक राजकीय वादळात ते काँग्रेसबरोबर ठाम राहिले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. ते कुठेही जाणार नाहीत, असा ठाम विश्वास लियाकत शहा यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The Chief Minister visit is not a change of party, the Congress leader clarified his position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.