मंडणगड : तालुक्यातील पणदेरी धरण हे पुनर्बांधणी करून नव्याने बांधावे लागणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आल्याचे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव जमीर माखजनकर यांनी सांगितले. ही अत्यंत गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली असून, यामुळे कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे माखजनकर यांनी सांगितले.
याबाबत माखजनकर यांनी सांगितले की, आज हे धरण ७५ टक्के कोरडे झाले आहे. संपूर्ण धरणाची डागडुजी करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला आहे. एक महिन्याआधी परिसरातील जनतेला पाटबंधारे विभागाच्या व ग्रामपंचायतीमार्फत धरणातील पाणीसाठा खाली करण्याबाबत नाेटीस बजावण्यात आली हाेती. पण, डागडुजी सुरू करण्याआधी पाटबंधारे विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या धरणाची पुन:पुन्हा डागडुजी करून काही उपयोग होणार नाही, असे सांगण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार संपूर्ण धरणाची स्थिती ही बाद व धोकादायक अवस्थेत झाल्यासारखी शासनाच्या व पाटबंधारे विभागाला दिसली. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या पंदेरी धरणाची खरी व सत्य माहिती समोर आल्याचे माखजनकर यांनी सांगितले. पंदेरी धरणाची पुढील वाटचाल म्हणून या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून व रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागामार्फत विचार झाला आहे.
त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागातर्फे नवीन सर्वेक्षण करून त्याचा अहवाल व आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, या धरणाच्या नवीन पुनर्बांधकामासाठी नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
शासनाच्या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये या पंदेरी धरणाच्या नवीन बांधकाम प्रस्तावाला शासनाची मान्यता व मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा धोका निर्माण होऊ नये म्हणून धरण आहे त्याच स्थितीत ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर धरणाच्या नवीन बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.