रत्नागिरी : माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिली असून, त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी निविदा उघडणार आहे.दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे आपले नाही, असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे. हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे, असा दावा किरीट सोमय्या करत आहेत. त्यांनी यासंदर्भात पुन्हा एक ट्विट करून माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात की, चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे. ही जाहिरात साई रिसॉर्ट पाडण्यासाठी आहे. त्यासाठी कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केलीय.साई रिसॉर्टच्या एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊड वॉल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडण्यात येणार आहेत. पाडापाडीनंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर या जागेचे सपाटीकरण करावे लागेल, असे बांधकाम विभागाने दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.
अनिल परबांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार, बांधकाम विभागाने दिली जाहिरात
By अरुण आडिवरेकर | Published: October 22, 2022 4:13 PM