देवरुख : देवरुख येथील खालची आळी येथे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विवाहितेचा ३१ जुलै राेजी झालेला मृत्यू आकस्मिक नसून ती आत्महत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिने लिहिलेली सुसाइट नोट सापडल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती अभिजीत पवार याच्यावर सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना रविवारी सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमाराला घडली होती. दीप्ती अभिजीत पवार (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याची माहिती दीप्ती हिचा पती अभिजीत दिलीप पवार (३१, रा.मच्छीमार्केट, देवरुख) याने दिली होती. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी गेली होती. घरी येताना ती रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवरुख पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती.या घटनेचा पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव तपास करत होते. तपासादरम्यान तिच्या राहत्या घरातून एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत आपला पती कायम संशय घेतो, मारहाण करतो, असे लिहिल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांनी सोमवारी भेट देत, या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर, तिच्या नातेवाइकांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पती अभिजीत पवार याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुखमधील ‘त्या’ विवाहितेचा आकस्मिक मृत्यू नाही, तपासादरम्यान कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 4:10 PM