गणपतीपुळे : मराठी भाषेचा जगभर प्रसार व्हावा, यासाठी मराठी भाषेला वाहिलेले देशातील पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम रविवारी मालगुंड येथे कविवर्य केशवसुत स्मारकात झाला. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, कोमसाप तथा भाषा विकास समितीच्या सदस्या नमिता कीर, कोमसापचे सल्लागार, मार्गदर्शक अरुण नेरुरकर, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रदीप तथा बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत सावंत, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, जिल्हा परिषद सदस्या साधना साळवी, मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी, पंचायत समिती सदस्य उत्तम मोरे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष शशांक पाटील, युवाशक्ती जिल्हा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळे, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील उपस्थित होते.सकाळच्या सत्रात मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयापासून कवी केशवसुत स्मारकापर्यंत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी नेण्यात आली. विविध आकर्षक वेशभुषा केलेले विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ यात उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांनी कवी केशवसुत आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले.मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, ती जगाच्या पाठीवर पोहाेचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठमहाराष्ट्रात करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, तेही त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 1:47 PM