रत्नागिरी : ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, फटक्यांची आतषबाजी आणि महाराजांच्या जयघोषात, अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साेमवारी लोकार्पण करण्यात आले. रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.या लाेकार्पण साेहळ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करुन रत्नदुर्ग शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टॅचू गॅलरीची पाहणी केली. तेथून कळ दाबून समोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. शिवपुतळ्याचे लाेकार्पण हाेताच उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, कोकणातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या शिवसृष्टीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पहायला मिळेल. अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उभा पुतळा आहे. जे जे स्कूल ऑफ ऑर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.