रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे आज, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी - हातखंबा मार्गावर निवळी बावनदी येथे दरड कोसळली होती. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून महामार्ग ठप्प झाला. मात्र, शासकीय यंत्रणेची वाट न पाहता माजी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप यांनी याठिकाणी यंत्र सामुग्री पाठवून दरड हटवली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.बावनदी निवळी परिसरातील रामू गादीवडार, संतोष पाध्ये, दीपक कोकजे, विशाल गावडे, राहुल सावंत, सरपंच तन्वी कोकजे घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग तातडीने सुरु करण्यासाठी महामार्गावरील दरड हटवणे गरजेचे होते. या मंडळींनी ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप यांच्या कानावर घातली. तातडीने महेश म्हाप यांनी जेसीबी पाठवून महामार्गावरील दरड हटवली आणि रस्ता मोकळा करून दिला.
सरकारी यंत्रणेची वाट न पाहता तातडीने लोकांच्या मदतीला धावून वाट मोकळी करून दिल्याने महामार्गावरील प्रवाशांनी महेश म्हाप आणि निवळी बावनदी परिसरातील ग्रामस्थांना धन्यवाद दिले.