रत्नागिरी : महायुतीने आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करायचे आहे. मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७४ पैकी ७० जागा जिंकायचा निर्धार महायुतीने केला असल्याचे राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात रविवारी महायुतीच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागा महायुतीने लढवायच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील विधानसभेची निवडणूक होईपर्यंत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय व अन्य पक्षांचे नाव महायुती आहे. अशा प्रकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी झालेल्या महायुतीच्या बैठकीत मांडली आहे. लोकसभेला मुस्लिमांमध्ये तसेच गरीब बंधू-भगिनींमध्ये गैरसमज पसरविण्यात आल्यानेच उद्धवसेना आणि काँग्रेसला लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, आम्ही कोकणामध्ये खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मात्र, आता या सर्वांनी एकत्र येऊन आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण नक्की कोणाचे विरोधक आहोत आणि आपले विरोधक कोण आहेत, हे आपण भविष्यामध्ये समजून घेतले पाहिजे. या व्यासपीठावरील सर्व मंडळी हृदयापासून एकत्र आलो तर या कोकणातील ७० जागा जिंकून पुन्हा एकदा २०० जागांच्या पुढे जाऊन महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणेंकडेबैठकीनंतर तीन-चार गोष्टींची चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीची बदनामी होणार आहे. खासदार नारायण राणे व्यासपीठावर नसल्याचा खुलासा मंत्री सामंत यांनी केला. ते म्हणाले की, नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणून नियोजनाच्या बैठकीला न बोलावता २० तारखेला महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा पदाधिकारी अनुपस्थितरत्नागिरीत झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला भाजपाचे उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीतील अन्य भाजपा पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्येही शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात हाेते.