रत्नागिरी : ग्लोबल कोकणतर्फे हॉलंड, लंडन येथे शेतकरी आंबाबाजार आयोजित करण्यात येणार आहे. तिथल्या मराठी तरुणांच्या मदतीने हा उपक्रम येत्या मे महिन्यात होणार असल्याची माहिती ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी दिली.
कृषी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत एक्सपोर्ट हापूस आंब्याच्या पेटीचे अनावरण करण्यात आले. कोकणातील शेतकऱ्यांचा हापूस आंबा थेट युराेपमध्ये निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोकणातील हापूस आंबा इंग्लंडमधील नागरिकांना चाखायला मिळणार असल्याने कोकणवासीय समाधान व्यक्त करत असून आपल्या मातीतील आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळणार असल्याने बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सचिन शिनगारे, तेजस भोसले, सचिन कदम या मराठी तरुणांच्या मदतीने शेतकरी आंबाबाजारच्या माध्यमातून संपूर्ण युरोपमध्ये जर्मनी, हॉलंड आणि युनायटेड किंगडम या परिसरात थेट कोकणातून हापूस आंबा जाणार आहे. युरोपच्या प्रगत बाजारपेठेत कोकणातील हापूस आंबा सहजपणे उपलब्ध व्हावा, याकरिता ग्लोबल कोकणने पुढाकार घेतला आहे. प्रसिद्ध निर्यातदार डॉ. दीपक परब या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. युरोप आणि जगभरात हापूस आंब्याची बाजारपेठ कोकणातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित करण्याचा ग्लोबल कोकणचा मानस असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.