दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील सर्व कृषी अभियंत्यांचे गेले सतरा दिवस राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे. अद्याप शासनाने व आयोगाने आंदाेलनाची दखल घेतलेली नाही. महाराष्ट्रात संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचा आराेप करत विद्यार्थ्यांनी त्याच्या निषेधार्थ कँडल मार्च आंदोलन करून निषेध केला. तसेच टाळ-मृदंगाचा नाद करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंत्यांचे बेमुदत राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. २५ जानेवारीपासून या विद्यार्थ्यांनी हे आंदाेलन सुरू केले आहे. अद्यापही या आंदाेलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी (१० फेब्रुवारी) विद्यार्थ्यांनी कँडल मार्च आंदाेलन केले. तर टाळ-मृदंगाचा गजर केला.कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तत्काळ स्थगिती द्यावी. राज्यांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे आंदाेलन सुरू आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरूच, सरकारने घेतली नाही अद्याप दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 2:17 PM