लांजा : सलग चार दिवस मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आंजणारी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. सायंकाळी ४ नंतर या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.गेले चार दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल लांजा पाेलीस व हातखंबा येथील वाहतूक पाेलीस यांनी सकाळी १०.३० वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला हाेता. दुपारी २.१५ वाजता छोटी वाहने तसेच सायंकाळी ४ वाजता पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती. काजळी नदीला पूर आल्याने मठ येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली गेले होते. तसेच बेनी नदीही पात्र सोडून वाहू लागल्याने साटवली - भंडारवाडी येथील घरांमध्ये हळूहळू पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. साटवली येथील मोरीवर पुराचे पाणी आल्याने येथील वाहतूक पुराचे पाणी कमी होईपर्यंत थांबण्यात आली होती.दोन दिवस पडलेल्या पावसाने वाडीलिंबू येथील मनोहर काशिनाथ पाटणकर, वेरवली येथील रेश्मा रमेश गांगण आणि विवली येथील देऊ धाकू कोलापटे यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तालुक्यातील मुचकुंदी, बेनी, नावेरी, काजळी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नद्यांनी पात्र सोडले हाेते. पुराचे पाणी नदीकाठावरील असलेल्या शेतामध्ये शिरल्याने शेती पाण्याखाली गेली हाेती.
पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:47 PM