राजापूर : भावकीतील वादातून बावीस वर्षीय तरुणीचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना १८ जानेवारी राेजी राजापूर तालुक्यातील भालावली येथे घडली. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या साक्षी गुरव हिच्यावर गुरुवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित आरोपी विनायक शंकर गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुवारी (दि. १९) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.गावातील जमीन जुमला तसेच भावकीतील वादातून हल्लेखोर विनायक शंकर गुरव याने साक्षी मुकुंद गुरव आणि सिद्धी शंकर गुरव यांच्यावर दांडक्याने हल्ला केला होता. त्यामध्ये साक्षी हिचा जागीच मृत्यू झाला हाेता तर सिद्धी गंभीर जखमी झाली होती. या हल्ल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी संशयित हल्लेखोर विनायक याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२, ३२६, ५०६, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी त्याला राजापुरातील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती नाटे पोलिसांनी दिली.पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि दुसऱ्या गटात भावकीतून वाद सुरू होता. यामध्ये सुवेर - सूतक न पाळणे, देवस्थानचा दास्तान विनायक गुरव आणि त्याच्या गटाला न मिळणे, सुरू असलेल्या घराच्या बांधकामाला मिळालेली स्थगिती अशा काही घटना या वादासाठी कारणीभूत ठरल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. त्यातूनच धमक्याही देण्यात आल्या होत्या, अशीही माहिती समोर आली आहे.अखेर त्या वादातूनच साक्षीचा बळी गेला. दरम्यान, हल्ल्यात मृत्यू झालेल्या साक्षीच्या मानेसह डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. तिच्या देहाचे विच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेली सिद्धी हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भावकीतील वादातूनच साक्षी गुरवचा घेतला बळी, राजापुरातील घटना; संशयिताला काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 7:05 PM