चिपळूण : चिपळूणमध्ये नीलेश राणेंचे जे गुंड आले होते, त्यांची नावे मी पोलिसांना दिलेली आहेत. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही किंवा त्यांना अटक झाली नाही तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. येत्या दोन दिवसांत पुढची रणनीती ठरवून शिवसेना स्टाइलने रणांगणात उतरणार, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला.चिपळुणात झालेल्या राड्यानंतर खासदार विनायक राऊत बुधवारी जिल्ह्यात आले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची रत्नागिरीत भेट घेतल्यानंतर ते रात्री उशिरा चिपळुणात दाखल झाले हाेते. यावेळी त्यांनी राड्याप्रकरणी भूमिका मांडली. ते म्हणाले की, चिपळुणात झालेला राडा राणे कंपनीने जाणीवपूर्वक घडवून आणला. त्यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. पोलिस केवळ आमच्याच लोकांवर कारवाई करत असतील तर ते अजिबात सहन करणार नाही. राणे आणि कंपनीची ही सवयच आहे. स्वतः लढायचे नाही, बाहेरील भाडोत्री गुंडांना आणत हैदोस घालत सुटायचे. त्यांचे हे धंदे मला चांगलेच ज्ञात आहेत, असे खासदार राऊत म्हणाले.
मुंबई, कोल्हापूरच्या गुंडांना चिपळुणात आणून राडा करणाऱ्या माजी खासदार नीलेश राणे यांना सत्तेचा माज आहे. मात्र, हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. भास्कर जाधव पक्षाचे नेते असून, त्यांच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. राड्याप्रकरणी केवळ ठाकरे सेनेला पोलिस लक्ष करीत आहेत. केवळ ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून कारवाईत दुजाभाव केला जात आहे. मात्र, याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याशी बैठक घेऊन दोन दिवसांत रणनीती ठरवून रणांगणात उतरणार, असा इशाराही त्यांनी दिला.सिंधुदुर्गात त्यांना कोण विचारत नाही म्हणून येथे येऊन हंगामा घालताहेत. पण, ही मस्ती येथेही चालू देणार नाही. गुहागरच्या सभेत नीलेश राणेंनी वापरलेली असभ्य भाषा महिलांचा अवमान करणारी आहे. ही सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज आहे, असेही ते म्हणाले.
समोरासमोर लढण्याचे धाडस करावेनारायण राणे यांना भाजप लोकसभेत उमेदवारी देणार होती ना, मग का आता शेपूट का घातली? आमच्या समोर लढण्याची त्यांची हिंमत नाही. लोकसभेला समोरासमोर त्यांनी लढण्याचे धाडस करावे, असेही खासदार राऊत म्हणाले.