अरुण आडिवरेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरी एसटी आगारात दाखल झालेल्या नव्या एसटी रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एसटीच्या नव्या गाड्या प्रवाशांना डोकेदूखी ठरत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मुंबईकडे जाणारी एसटी बस संगमेश्वर येथे बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करत सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरीत आगारात २२ गाड्या नव्या कोऱ्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या गाड्यांपैकी सुटलेली रत्नागिरी - मुंबई सेंट्रल गाडी मंगळवारी मध्यरात्री महामार्गावर संगमेश्वर मध्ये बंद पडली. दुसरी पर्यायी गाडी उपलब्ध करून देण्यास मोठा कालावधी गेल्याने तब्बल साडेतीन तास मुंबई - गोवा महामार्गावर प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
रत्नागिरीतून दुसरी गाडी आल्यानंतर प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. या साऱ्या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सहा महिन्यातच गाड्या रस्त्यावर बंद पडू लागल्याने गाड्या व त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी एसटी आगारात मोठा गाजावाजा करून आणण्यात आलेल्या नव्या गाड्या कंत्राटी स्वरुपात घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी व गाड्यांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्नच आहे.