मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर तरीही मर्यादित ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या राजकीय घडामोडींचा फटका चांगलाच बसणार आहे. जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम यांनी नव्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याने जुन्या राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वजन खूप मोठ्या प्रमाणात घटणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारे नेते जिल्ह्यात असले तरी सुनील तटकरे यांचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवरील पगडाही मोठा आहे, हे विसरून चालणार नाही.जिल्ह्यात १९९० नंतर शिवसेना-भाजप युतीचे प्राबल्य वाढले. त्यातही शिवसेनेने जिल्ह्यात मोठी मुसंडी मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वात पहिल्या फळीत कोकणातील अनेक नेते होते आणि त्यांनी आपापल्या गावात पक्ष मोठा केला. तेव्हा वाढलेली शिवसेना थोड्याफार प्रमाणात अजूनही तशीच आहे. ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत सर्वच ठिकाणी शिवसेनेने आपले प्राबल्य कायम ठेवले.१९९९ साली राष्ट्रवादीने स्वतंत्र चूल मांडली. काँग्रेसमधील लोकच राष्ट्रवादीत गेले. पण त्यांनी नव्या दमाने काम सुरू केले. १९९९ साली राष्ट्रवादीला जिल्ह्यात यश मिळाले नाही, पण २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रत्नागिरी आणि चिपळूण या दोन मतदारसंघांत यश मिळाले. २००९ च्या निवडणुकीत चिपळूण पुन्हा शिवसेनेकडे गेले. पण त्यावेळी रत्नागिरीसह गुहागर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पाचपैकी दोन मतदारसंघ आपल्याकडे ठेवत राष्ट्रवादीने आपली ताकद कायम ठेवली.२०१४ च्या निवडणुकीत उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा कमी हाेण्याची भीती होती. मात्र गुहागरसह दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळाले. राष्ट्रवादीचे दोनचे संख्याबळ कायम राहिले. २०१९ च्या निवडणुकीत मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने गुहागरची जागा राष्ट्रवादीकडून गेली. दापोलीची जागाही शिवसेनेकडे गेली. मात्र शेखर निकम यांच्या रूपाने राष्ट्रवादीला चिपळुणात यश मिळाले. पाचपैकी एक जागा तरी राष्ट्रवादीकडे राहिली. आता शेखर निकम यांनीच जुनी राष्ट्रवादी सोडून अजित पवार यांच्यासाेबत जाण्याचा निर्णय घेतल्याने चिपळूण मतदारसंघही जुन्या राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरण पूर्ण ढवळून निघाले आहे.
पवार यांना मानणारा वर्ग ठाम, पण...केवळ नेतेच नाही तर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाही नावानिशी लक्षात ठेवण्यात शरद पवार उजवे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शरद पवार यांचेच नेतृत्त्व मानतात. वैयक्तिक संपर्क ही शरद पवार यांच्यासाठी जमेची बाजू आहे. असे जुने लोक जुनी राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत. पण अशा पदाधिकाऱ्यांची संख्या आता कमी आहे. अलिकडच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत.
सुनील तटकरे यांचा प्रभाव अजून कायमआधी पालकमंत्री म्हणून आणि नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बराच संपर्क आहे. प्रभावही आहे. त्यात त्यांच्या खासदारकीच्या मतदार संघात गुहागर, दापोली, खेड आणि मंडणगड हे चार तालुके समाविष्ट असल्याने त्यांचा या भागात अनेकदा दौराही होतो. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर त्यांचा प्रभाव टिकून आहे. याचा फायदा नव्या राष्ट्रवादीला होईल.
शेखर निकम यांची जाेडणी महत्त्वाची२०१९ साली आमदार झाल्यानंतर शेखर निकम यांनी चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांना भेट देऊन पक्षाची चांगली जोडणी केली आहे. मितभाषी आणि स्वच्छ राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे. आपल्या मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चांगला संपर्क ठेवला आहे. त्याचा फायदा नव्या राष्ट्रवादीला होईल, यात शंका नाही.