रत्नागिरी : शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेची जय्यत तयारी रत्नागिरीत सुरु आहे. त्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी बॅनर झळकले असून, यातील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या गाजत असलेल्य स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुकांत सावंत यांचा फोटो या बॅनरवर असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनाेबल उंचावण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्यानिमित्ताने रत्नागिरीत १६ सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील साळवी स्टॉप येथे तयारी सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर झळकले आहेत. ज्याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे, त्याचठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भले माेठे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील एका बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगू लागली आहे.शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुकांत सावंत यांचा एका बॅनरवर फाेटाे लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फाेटाे छापण्यात आले आहेत. त्याचबराेबर सुकांत सावंत यांचा फाेटाे लावण्यात आल्याने साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुकांत सावंत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख असले तरी सध्या त्यांना स्वप्नाली सावंत खून प्रकरणी मुख्य आराेपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याने या खुनाची कबुलीही दिली आहे.
रत्नागिरीत 'शिवसंवाद' यात्रेची जय्यत तयारी, शिवसेनेच्या बॅनरवरील ‘त्या’ फोटोमुळे खळबळ
By अरुण आडिवरेकर | Published: September 15, 2022 3:33 PM