रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे निर्णय घेतील. हे चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. मात्र, महायुतीचे आमदार कसे वाढतील, यासाठी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी काम करतील, असे भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाच्या रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, यावेळी विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपाकडून जनतेला काय हवे आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे जनतेकडून ऑनलाइन मागवण्यात आलेले आहे. जनतेच्या अपेक्षा हाच आपला जाहीरनामा राहणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.
माजी आमदार बाळ माने हे लवकरच उद्धवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, माजी आमदार बाळ माने हे आमचे नेते असून, ते पक्षाबरोबरच आहेत. गेल्या २० वर्षात भाजपाच्या रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात भाजपाला एकही विधानसभेची जागा दिलेली नाही. याबद्दलही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. मात्र, काय चर्चा झाली याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष देतील त्याच उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.