राजापूर : राज्य सरकारच्या यावर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राजापूर व कोल्हापूर यांना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. या घाटाच्या खोदकामानंतर कोकणातून कोल्हापूरला जोडणारा आणखी एक घाटमार्ग भविष्यात उपलब्ध होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकण-कोल्हापूरसाठी एखादा भक्कम आणि तेवढाच महत्त्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे.त्यादृष्टीने काजिर्डा घाटरस्त्याचा मुद्दा पुढे आला. यापूर्वी १९७४/७८ साली रोजगार हमी योजनेतून काजिर्डा-कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र त्याच दरम्यान अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला आरंभ झाला आणि काजिर्डा मार्गे घाटरस्त्याचे काम मागे पडले. नंतर अणुस्कुरासह गगनबावडा घाटांना महत्त्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला.
काजिर्डा घाट खोदकाम प्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी लक्ष घालून शासनदरबारी हा विषय उचलून धरला. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे; तसेच निविदा प्रक्रिया सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
असा असेल नवीन मार्ग
कोल्हापूर, कळे, बाजारभोगाव, काळजवडे, पडसाळी, काजिर्डा, मूर, तळवडे, पाचल, रायपाटण, ओणी, राजापूर असा हा घाटरस्त्याचा मार्ग असणार आहे.
घाटाची ठळक वैशिष्ट्ये :काजिर्डा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ५० ते ५५ किमीचे असून, अन्य घाटमार्गाच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ किमी अंतर वाचू शकणार आहे.रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घाट.आजूबाजूच्या ५५ ते ६० गावांना कोल्हापूरसाठी जाणे फायद्याचे होणार आहे. नियोजित काजिर्डा घाटामुळे एक तास प्रवासाची बचत होईल.