रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पाेलिस स्थानकांतर्गत सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हरवलेले माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आले आहे. हरवलेल्या तब्बल ४५ माेबाइलचा पाेलिसांनी शाेध घेतला. या माेबाइल मालकांचा शाेध घेऊन पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ते परत करण्यात आले.सायबर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अमित यादव, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलिस हवालदार दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलिस हवालदार रमिज शेख, पोलिस शिपाई नीलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापूर, सावर्डे, देवरूख या पोलिस स्थानकांचे पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम करून प्राप्त माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाइलचा शोध घेतला.या प्रक्रियेमध्ये एकूण ४५ मोबाइलचा शोध लागला. त्यातील २७ माेबाइल त्यांच्या मालकांना धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालय येथे परत देण्यात आले. उर्वरित माेबाइल सायबर पाेलिस स्थानकातून नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी सायबर क्राईमसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तत्काळ जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याबाबत धनंजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कोणालाही ओटीपी शेअर करू नका, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करू नका. तसेच आपले कोणतेही वैयक्तिक फोटो/व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर न करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. -धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी