शिवाजी गोरे
दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी स्टेट बँक ऑफ दापोली शाखेच्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांना अटक झाली. हाती आलेल्या माहितीनुसार नीलिमा चव्हाण हिच्यावर बँकेतील एक कर्मचारी वारंवार कामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुदेश गायकवाड याच्या विरुद्ध नीलिमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायकवाड हा मूळचा कोडोली, पन्हाळा कोल्हापूर जिल्हयातील असून सध्या टीआरपी रत्नागिरी इथे वास्तव्यास आहे. फिर्यादीत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी आपली मुलगी दापोली इथल्या ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचं सांगितले आहे. तिच्या कामात नेहमी १५ दिवसांच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना ही फोन येत असत असे सांगितले आहे. तसेच आपल्या मुलीला दिवसाला चार ते पाच डी mat खाती उघडण्यासाठी गायकवाड जाणूनबुजून दबाव टाकत असल्याचं सुट्टीच्या दिवशी दरखेपेस नीलिमा आपल्याला व आपल्या भावाला सांगत असल्याचं नमूद केले आहे.
नोकरी सुरू झाल्यापासून गायकवाड नीलिमावर कामाच्या संदर्भात सातत्याने दबाव टाकत होता. तिला काम जमत नसल्याचं सांगत नोकरीवरून कमी करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. यातूनच नीलिमाच्या मनावरील ताण वाढत होता. तसेच गेले काही दिवस ती घरात व्यवस्थित जेवत देखील नव्हती, असे या फिर्यादीत नमूद केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी निलीमाचा मृत्यू ही आत्महत्या होती घातपात झाल्याचा कोणता पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचे विष दिसून आलेले नाही, असे नमूद केलेले असून या संपूर्ण प्रकरणात गायकवाड याच्या अटकेमुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. तसेच २२ तारखेला होणारे आंदोलन होणार का याचीही चर्चा सुरू आहे.