खेड : शहरातील जगबुडी नदीपात्रातील चार महिने रखडलेल्या गाळ उपसण्याच्या प्रक्रियेची जलसंपदा विभागाच्या अलोरेतील यांत्रिकी प्रशासनाने मंगळवारी सुरुवात केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने दोन मोठे पोकलेन मशिनही उपलब्ध झाले असून, याद्वारे नदीपात्रात सोमवारी गाळ उपसण्याची चाचणी घेण्यात आली. येत्या काही दिवसांतच आणखी दोन पोकलेन मशिन उपलब्ध होणार आहेत.गतवर्षी मे अखेरपर्यंत ५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला होता. पावसाळ्यात ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यानंतर ५ महिने जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रिया रखडली होती. याप्रश्नी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गंभीरपणे लक्ष घालत तातडीने जलसंपदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गाळ उपसा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी दोन मोठे पोकलेन मशिन उपलब्ध झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या रांगातून जगबुडी नदीने वाहून आणलेला गाळ नदीच्या या भागातील पात्रात साचला आहे. गतवर्षी गाळ काढण्याच्या कामाला शासकीय यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवला हाेता. मात्र, निधी मंजुरी व परवानगी हे पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना मिळाल्याने कामाबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अलोरे यांत्रिक विभागाने कामाला गती देत गाळ उपसा सुरू केला.दररोज सुमारे दोनशे ब्रास गाळ उपसा सुरू होत होता. पावसाळा सुरू हाेताच हे काम थांबले हाेते. मात्र, निधी मंजूर असल्याने हे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विधानसभा निवडणुका व अन्य कामांमध्ये यंत्रणा गुंतल्याने गाळ उपसा थांबला हाेता. या गाळ उपशाला मंगळवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी यंत्रसामग्रीही दाखल झाली आहे.
नदीपात्रातील उपसा केलेला गाळ कुणाला आवश्यक असेल, तर स्वखर्चाने वाहून न्यावे. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. - सुधीर सोनावणे, तहसीलदार, खेड