रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचेरी, असोडे आणि बावनदी धरणातील गाळ उपसण्यासाठी सन २०१९मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीचा प्रस्ताव दिला आहे. चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापर्यंत गाळ काढण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर्षीही धरणातील गाळ उपसा होण्याची शक्यता कमी आहे.औद्योगिक विकास महामंडळाने सन १९७० मध्ये हरचेरी येथे धरण बांधले. सुमारे २.९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या धरणाची आहे. परंतु, गेल्या ५५ वर्षात एकदाही धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. यासाठी सन २०१९ मध्ये औद्योगिक विकास महामंडळाने हरचेरीसह असोडे (लांजा), बावनदी धराणातील गाळ उपसण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. परवानगीची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल चार वर्ष धूळखात पडून आहे.हरचेरी धरणावरून मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसीसह रत्नागिरी शहराचा वरचा भाग तसेच नऊ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. तर बावनदी धराणातून जिंदलसह जयगड पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा केला जातो.सध्या हरचेरी धरणात ६ जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यास एमआयडीसीला पाणीटंचाईची झळ बसते. यावर्षी एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे. सद्यस्थितीत गाळ काढण्याचे काम होऊ शकते.परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी न दिल्याने गाळ काढण्याचे काम सुरू करणे शक्य नाही. एमआयडीसीच्या हरचेरी धरणात काही लाख हजार क्युबिक मीटर गाळ आहे. तर बावनदी, असोडे धरणाचीही हिच स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
Ratnagiri: हरचेरी, असोडे अन् बावनदी धरणातील गाळ उपशाचा प्रस्ताव चार वर्षे पडला खितपत
By अरुण आडिवरेकर | Published: May 10, 2023 3:55 PM