रत्नागिरी : प्रकल्प होत असताना विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी पुढे यायचे, असा दुटप्पीपणा रिफायनरी प्रकल्पाबाबत कोणी करू नये. कोकणातील रोजगार निर्मितीसाठी रिफायनरी प्रकल्पाची गरज आहे. तो ठरलेल्या ठिकाणीच होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. लवकरच रिफायनरीसाठीच्या जमिनीचा दर सरकार जाहीर करेल, असेही त्यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणासाठी काजू बोर्ड मंजूर केले आहे. आंबा बोर्डाबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. त्यालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. काजू बोर्डासाठी १३५० कोटी रुपये देणार आहोत. २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून काजू लागवडीला, प्रक्रिया उद्योगाला मोठा हातभार लागेल, असे ते म्हणाले. काजू बोंडावर प्रक्रिया झाली तर त्यातून उत्पन्नही वाढेल आणि कोकणातील लोकांना कोकणातच रोजगार मिळू शकेल. त्याबाबतही सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.मुंबई-गोवा महामार्गाचे काम यापूर्वीच होणे अत्यावश्यक होते. मात्र, ठेकेदाराकडून ते झाले नाही. त्याचा पाठपुरावा आता सुरू आहे. ते काम लवकर पूर्ण करून घेण्याची सूचना आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना केली आहे. संपर्काच्या दृष्टीने, दळणवळणाच्या दृष्टीने महामार्ग लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातून पर्यटनालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे ताे लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.कोयना अवजलाचा वापर कसा करता येईल, याबाबतचा आढावा घेण्याची सूचना आपण जलसंपदा विभागाच्या सचिवांना केली आहे. जर या पाण्याचा वापर करता आला तर बारमाही पिकेही घेता येतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.रिफायनरी विरोधकांच्या गाड्या रोखल्याबारसू रिफायनरी प्रकल्प विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत येत असताना भाट्ये पुलावर त्यांच्या तीन गाड्या अडविण्यात आल्या. या सर्वांना पुन्हा परत पाठवून पावस येथील पोलिस चौकीत बसवून ठेवण्यात आले.
CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 1:50 PM