रत्नागिरी: श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे 'रत्नागिरी रिक्षा सुंदरी' या अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या रिक्षांनी दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळवित ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’ होण्याचा बहुमान पटकाविला आहे. अविनाश दिंडे, संकेत पवार यांच्या रिक्षांना प्रथम क्रमांक मिळाला असून दोघांनाही रोख २१ हजार रूपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.व्यवसायासाठी वापरणाऱ्या रिक्षांची वेगवेगळ्या पध्दतीने कशी सजावट केली जाते. प्रवाशांना ते कोणकोणत्या अधिकच्या सुविधा देतात याची माहिती सर्वांना यासाठी तुषार साळवी यांनी श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, निपाणी, मुंबई, पुणे, रायगड येथील पन्नास रिक्षा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.सन २०१९ ते २०२३ वर्षातील गटात प्रथम क्रमांक अविनाश दिंडे (कोल्हापूर) यांनी मिळविला. दिंडे यांनी अनोख्या पध्दतीने रिक्षा सजवली होती. रिक्षामध्ये वायफायसह, वृत्तपत्र, पिण्याचे पाणी, फायरफायटर, आकर्षक सीट, अंतर्गत सजावटीवर भर दिला होता. रिक्षाच्या टपावर किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती.रिक्षाव्दारे दिंड गरोदर माता, दिव्यांग, सैनिक यांच्यासाठी मोफत सेवा देत असून त्यांचे कार्य वैशिष्टयपूर्ण ठरले.सन २०१९ पूर्वीच्या रिक्षा या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक संकेत पवार (कोल्हापूर) यांनी मिळविला पवार यांनीही दिंडेंप्रमाणेच सजावट रिक्षात केली होती. रिक्षाव्दारे सामाजिक कार्यावर संकेत पवार विशेष भर देत आहेत.सन २०१९ ते २३ वर्षातील गटात व्दितीय क्रमांक समीर बोले ( संगमेश्वर), तृतीय क्रमांक प्रसाद दुर्गवळी (दापोली) तर उत्तेजनार्थ क्रमांक अनिकेत पवार ( कोल्हापूर) यांनी मिळविला.सन २०१९ पूर्वीच्या रिक्षा या दुसऱ्या गटात शिवांग अडूरकर (कोल्हापूर), तृतीय क्रमांक रईस (बेळगाव), उत्तेजनार्थ क्रमांक आरव शिंदे (बेळगाव) यांनी मिळविला. सर्व विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे देत उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते गाैरविण्यात आले.एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा स्टेजवर आलेल्या पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेता विनोदवीर अंशुमन विचारेसह, गायिका ईशानी पाटणकर यांच्या वाद्यवृंदाने कार्यक्रमात आणखी रंगत आणली.
कोल्हापूरच्या रिक्षांनी पटकाविला ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’चा बहुमान, रोख २१ हजार व सन्मानचिन्ह देवून गौरव
By मेहरून नाकाडे | Published: May 02, 2023 7:07 PM