रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर शनिवारी (दि.१५) शाळेची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने नवागतांचे स्वागत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिक्षकांनी आपापल्या कल्पक बुध्दीने ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराजवळील नाचणे क्रमांक १ शाळेतील मुलांचे चक्क घोडागाडीतून शाळेत आगमन झाले.
शिक्षकांनी घोडागाडी सजविली होती. गाडीतून आलेल्या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते. मुलांचा वाजतगाजत घोडा गाडीतून प्रवेश करण्यात आला. नवागतांचे पारंपारिक पध्दतीने आैक्षण करून फुले उधळून स्वागत करण्यात आले. डिजीटल तंत्रज्ञानाचे वाढते आकर्षण असून सेल्फीची भूरळ अधिक असल्याने शाळेत मुलांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. पालकांनी मुलांना सेल्फी पाॅईंटवर उभे काढून फोटो काढले. या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.