रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून, १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. खवळलेल्या समुद्रात उंच लाटा उठत असून, किनाऱ्यांवर धडकत आहेत. त्यामुळे गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, आरे-वारे, नेवरे या किनाऱ्यांवर पर्यटकांनी पाण्यात उतरु नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर मागील तीन-चार दिवसांपासून चक्रीवादळाचा परिणाम किनाऱ्यावर जाणवत आहे. रविवारी भरतीच्यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेने रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असणाऱ्या गणपतीपुळे येथे मोठा तडाखा दिला होता. यात अनेक पर्यटक पाण्याबरोबर सुमारे २५ फूट किनाऱ्याकडे ढकले गेले होते. लाटेबराेबर अनेक पर्यटक किनाऱ्यालगतच्या संरक्षक भिंतीवर आदळले हाेते. त्यामुळे काही पर्यटक किरकाेळ जखमी झाले हाेते. यामध्ये किनाऱ्यावरील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
वाऱ्याचा वेग अजूनही कमी झालेला नाही व समुद्र खवळलेलाच आहे. गणपतीपुळेसह तालुक्यातील आरे-वारे, भाट्ये, मांडवी, नेवरे या किनाऱ्यांवरही लाटांचा प्रचंड मारा होत होता. भरतीच्यावेळी लाटा किनाऱ्याला धडकत होत्या. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे.पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतून आलेले पर्यटक खवळलेल्या समुद्रातही पाण्यात उतरण्यासाठी धडपडत असतात, परंतु अतिरेकपणा करुन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणपतीपुळे येथे पोलिसही लक्ष ठेवून आहेत.