चिपळूण : राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प बनावट नावांनी विकत घेतले गेले आहेत. त्याची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी खळबळजनक माहिती राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, तेलगीइतका मोठा स्टॅम्प घोटाळा झाला नसला तरी यात खूप मोठी गडबड आहे. हे स्टॅम्प कोणी खरेदी केले, हेही चौकशीत पुढे येईल. मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्थानकात ४ हजार ६८३ बोगस प्रतिज्ञापत्र सापडली आहेत. पोलिसांनी प्रतिज्ञापत्र असणाऱ्या लोकांना दूरध्वनी केले व त्याची माहिती घेतली. मात्र त्या व्यक्तींनी आपण कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नाही, अशी माहिती दिली. हा स्टॅम्प घोटाळा फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून, तो राज्यभर झाला असावा, अशी शंका आहे. त्यानुसार तपासही केला जात आहे.कोल्हापूरमध्ये क्राईम ब्रँच, सीबीआय चौकशीतून काम सुरू झाले आहेत. या प्रकरणातून अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. हे स्टॅम्प पेपर कोणी खरेदी केले, याची माहिती आपल्याकडे असली तरी चौकशी सुरू असल्याने आपण सध्या त्यावर बोलणार नाही. जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, याची आम्हाला खात्री आहे, असे सामंत यांनी सांगितले.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ज्या महिलेने हिंदू देवतांवर अन्याय केले त्यांच्याविषयी आपण काय बोलणार? आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत प्रश्न करण्यात आला असता आज विकासकामांच्या निधीसाठी आलो आहे. त्यामुळे त्याचविषयी बोलूया, असे सांगून त्यांनी प्रश्न टाळला.
बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 6:40 PM