दापोली : गेले काही दिवस गारठलेल्या दापोलीत गुरुवारी पारा आणखी घसरला आणि यंदाच्या हंगामातील नीचांकी ९.२ अंश इतके तापमान नोंदले गेले. डिसेंबर महिन्यात हुलकावणी देणाऱ्या थंडीमध्ये गेले काही दिवस सातत्य असल्याने बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद केली आहे. दापोलीमध्ये ७ जानेवारी रोजी १६.५ अंश, ८ रोजी १५.६ अंश, ९ रोजी १२.७ व १० जानेवारीला १०.२ असे किमान तापमान होते.कोकण किनारपट्टी भागात डिसेंबरमध्ये हुलकावणी दिलेल्या थंडीने जानेवारी महिन्यात मुक्काम करण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईसह कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारठ्यात वाढ झाली आहे. आगामी २४ तासात ते आणखी दोन ते तीन अंशाने खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.आर्द्रता व मंद वाऱ्यामुळे दाट धुक्याचा प्रभाव वाढणार असून, सकाळच्या सत्रात काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोली गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; बागायतदारांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 4:39 PM