गुहागर : मॅंग्रोव्ह फाउंडेशन व भारतीय वन्यजीव संस्थेकडून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून वेळास व आंजर्लेनंतर मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता मादी कासवाला गुहागर वरचापाठ समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारे आणखी दोन कासव पुढील दोन दिवसांत सोडण्यात येणार आहेत.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवाना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास कांदळवन कक्ष मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे करण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात दरम्यान ऑलिव्ह रिडले जातीची कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात.अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास स्थलांतर जाणून घेण्यासाठी सॅटेलाइट लावण्यात आले आहे. या अंतर्गत सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात येणार असून, दि. २५ जानेवारीला रात्री वेळास व आंजर्ले येथे दोन कासवे सोडण्यात आली. त्यानंतर आता गुहागर समुद्रकिनारी तीन कासवे सोडली जाणार आहेत यामधील पहिले कासव मंगळवारी सायंकाळी सोडण्यात आले.
यावेळी मुंबईतील कांदवळन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक डॉ. विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, रत्नागिरीचे विभागीय वनसंरक्षक दिलीप खाडे, विभागीय सहायक वनसंरक्षक अधिकारी सचिन निलख, चिपळूण परिक्षेत्राच्या वनाधिकारी राजश्री कीर, कांदळवन कक्षाचे परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वनपाल रामदास खोत, संतोष परशेट्ये, अरविंद मांडवकर आणि वनरक्षक संजय दुंडगे, कासवमित्र संजय भोसले व ऋषिकेश पालकर, मोहन उपाध्ये वेळास, अभिनय केळस्कर उपस्थित होते.
पाठीवर सॅटेलाइट लावलेल्या कासवाचे नाव ‘वनश्री’ ठेवण्यात आले आहे. या आधी कासवाला पकडल्यानंतर घरट्यामध्ये ११६ अंडी दिली. या हंगामामध्ये आजपर्यंत ४१ घरट्यांमधून ४९४४ अंडी झाली आहेत. या हंगामात १०० घरटी करण्याचे टार्गेट आम्ही धरले आहे. गत वर्षापासून जिल्ह्यात सर्वाधिक अंडी गुहागर समुद्रकिनारी मिळत आहेत. - संताेष परशेटे, वनपाल