चिपळूण : मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी घाटातील वाहतूक २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत रविवारी (२६ मार्च) रात्रीपर्यंत कोणतीच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील वाहतूक सुरूच राहणार आहे.महामार्गावरील ५.४० किलोमीटर लांबीच्या या घाटातील ४.२० किलोमीटर लांबीचे काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे घाटातील या अंतरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. उर्वरित १.२० किलोमीटरची लांबी ही उंच डोंगर रांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम करताना अडचणी येत आहेत. याठिकाणी डाव्या बाजूस सुमारे ६०० मीटर लांबीपर्यंत दुहेरी लांबीतील कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेल्या भागावरून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. तसेच सुमारे ५०० मीटरच्या अंतरात माती काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले आहे. केवळ १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या अंतरात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने तेथे चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत आहे. त्यापैकी तीन टप्प्यांतील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. हे काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न
- महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी परशुराम घाटातील काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने ठेकेदार कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. यांनी परशुराम घाट वाहतुकीसाठी २७ मार्च ते ३ एप्रिल २००२३ या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची विनंती केली आहे.
- त्याप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, चिपळूण प्रांताधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या.
- मात्र, अद्याप याविषयी कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.