रत्नागिरी : कोकणचे लाडके दैवत असलेल्या गणपत्ती बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देऊन चाकरमानी आता पुन्हा आपल्या कामावर हजर होण्यासाठी परतत आहेत. त्यामुळे कोकण मार्गावरील गाड्यांना दिवसरात्र मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव असल्याने यंदाच्या उत्सवाला चाकरमान्यांची अलोट गर्दी होणार, हे लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने यावेळी परिपूर्ण नियोजन केले असून राखीव पोलीस दल तैनात केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होऊनही सर्व व्यवस्था सुरळीत सुरू आहे.काेरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव तणावाखाली साजरा केला जात होता. पहिल्या वर्षी तर सर्वच बंद होते. दुसऱ्या वर्षी गणेशेात्सव निर्बंधाखाली साजरा झाला होता. मात्र, कोरोनाचे संकट टळल्यानंतर विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी भक्त आसुसलेले होते. त्यामुळे यंदा मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावाला परतणार हे लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने एक महिना आधीच अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार गणपती सणापुर्वी आठ दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर ये - जा करणाऱ्या सुमारे २९० गाड्या सोडण्यात आल्या आहेत.पाच दिवसांच्या गणेशाला सोमवारी निरोप दिल्यानंतर चाकमानी पुन्हा आपल्या कामावर जाण्यासाठी परतत आहे. त्यामुळे या मार्गावरच्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. दिवसभर रत्नागिरीचे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले दिसत आहे. रात्री सुटणाऱ्या गाड्यांना प्रवाशांकडून अधिक पसंती दिली जात आहे.रेल्वेतील मधल्या मोकळ्या जागेतही उभे राहून प्रवासी प्रवास करत आहेत. गाड्या खचाखच भरून जात आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने राखीव पोलीस दलाची कुमक तैनात केली आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान या गाड्यांमध्ये सुमारे २०० सुरक्षा रक्षक बंदोबस्त ठेवत आहेत. आठवडाभर कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कायम रहाणार आहे.रेल्वेस्थानकावर २४ तास बंदोबस्त तैनातरत्नागिरीतील रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयातील एक अधिकारी, चार अंमलदार आणि दोन गृहरक्षक दलाचे जवान मंगळवारपासून या रेल्वेस्थानकावर २४ तास तैनात ठेवण्यात आले आहेत.
परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी
By शोभना कांबळे | Published: September 06, 2022 4:19 PM