मनोज मुळ्येरत्नागिरी : बदलत्या राजकारणामुळे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेली विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आणि ऐन दिवाळीत जोरदार राजकीय शिमगा होणार असल्याचे स्पष्ट झाले. कागदावर ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दिसत असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ही लढाई दोन्ही शिवसेनांमधील वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. जिल्ह्यात शिंदेसेना मोठी की उद्धवसेना मोठी याचाच निवाडा या निवडणुकीतून होणार आहे.गेल्या पाच वर्षात राजकारण सतत बदलत राहिले. राजकीय पक्षांचे मित्र बदलले आणि नवनवी समीकरणे उदयास आली. रत्नागिरी जिल्ह्यावर, कोकणावर एकहाती वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे दोन भाग झाले. त्यामुळे आता कोणती शिवसेना अधिक ताकदवान हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेसेनेचे दोन, उद्धवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा एक असे पाच आमदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम राहणार की महाविकास आघाडी त्याला छेद देणार, हे येणारा काळच ठरवेल. अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केले नसले तरी विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात असतील, हे निश्चित आहे.यांची प्रतिष्ठा पणालाआमदार उदय सामंतराज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. कोट्यवधी रुपयांची कामे ही त्यांची प्रमुख जमेची बाजू आहे. त्याचवेळी भाजपला सोबत घेणे ही कसोटी ठरणार आहे.आमदार राजन साळवीराजापूर मतदारसंघात उद्धवसेनेची ताकद लोकसभा मतदारसंघात दिसली असली तरी शिंदेसेनेने उद्धवसेनेतील अनेकांना आपल्याकडे वळवले आहे. त्यात या जागेची अपेक्षा असलेल्या काँग्रेसची भूमिका काय असेल, हेही गुलदस्त्यात आहे.आमदार शेखर निकमजिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या शेखर निकम यांनी केलेली कामे ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र राष्ट्रवादीने केलेली तयारी आणि या मतदारसंघात महायुतीतील अन्य दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आमदार भास्कर जाधवस्वत:चा मतदारसंघ नसतानाही भास्कर जाधव यांनी सलग तीनवेळा गुहागरमध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध शिंदेसेना असेल की भाजप हे अजून अधिकृत जाहीर झालेले नाही. तरीही शिवसेनेतील फूट त्यांची कसाेटी पाहू शकते.आमदार योगेश कदमदापोली, मंडणगडमध्ये विकास कामांमधून छाप पाडणा या योगेश कदम यांचे मित्रपक्षातील भाजपशी असलेले शीतयुद्ध आता उघड झाले आहे. दोन्ही बाजूने झालेले आरोप प्रत्यारोप पाहता निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार, हे नक्की आहे.
रत्नागिरीत उद्धवसेनेचा उमेदवार नक्की कोण?निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरी रत्नागिरीमधील उद्धवसेनेचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. गेल्या वर्ष-दीड वर्षात चर्चा बरीच झाली. अनेकांची नावे पुढे आली. पण अजूनही त्याला अंतिम स्वरुप नाही. त्यामुळे पक्षातील व्यक्तीलाच उमेदवारी देणार की अन्य पक्षातील उमेदवाराला उद्धवसेनेत घेऊन उमेदवारी देणार, याबाबतच्या शंकेला वाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
काँग्रेसच्या वाट्याला मतदारसंघ नाही?काँग्रेसच्या रत्नागिरीतील एका बैठकीत राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या तीन मतदारसंघांची मागणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील एकही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात पाच मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ उद्धवसेनेला तर एक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला जाण्याची शक्यता आहे.भाजपची आक्रमक भूमिका किती टिकणार?लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपपेक्षा उद्धवसेनेला मते अधिक मिळाली. तेव्हापासून भाजपने शिंदेसेनेविरोधात काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातही रत्नागिरी आणि दापोली या दोन ठिकाणी जेथे शिंदेसेनेचे आमदार आहेत, तेथे भाजप शिंदेसेनेविरुद्ध आक्रमक असल्याचे दिसत आहे. ही भूमिका प्रचारादरम्यानही कायम राहणार की वरिष्ठ यात लक्ष घालणार, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.
राजकारणाची होणार फेरमांडणी
- २०१९ साली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा शिवसेना - भाजप आणि राष्ट्रवादी - काँग्रेस अशी पारंपरिक समीकरणे होती.
- निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी नाते तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीतील होते.
- २०२१ साली एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेत भाजपशी युती केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार हेही युतीमध्ये दाखल झाले आणि ती महायुती झाली.
- या बदलानंतर जिल्ह्यातील तीन आमदार सत्तेत आणि दोन विरोधी पक्षात असे चित्र झाले. तेही आता बदलण्याची शक्यता आहे.
संभाव्य लढतीरत्नागिरी : उदय सामंत (शिंदेसेना) विरुद्ध उद्धवसेना (उमेदवार निश्चित नाही.)राजापूर : राजन साळवी (उद्धवसेना) विरुद्ध किरण सामंत (शिंदेसेना)चिपळूण : शेखर निकम (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध प्रशांत यादव (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)गुहागर : भास्कर जाधव (उद्धवसेना) विरुद्ध शिंदेसेना (उमेदवार निश्चित नाही.)दापोली : योगेश कदम (शिंदेसेना) विरुद्ध संजय कदम (उद्धवसेना)