खेड : शहरातील भरणे नाका येथे जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत सुमारे १ काेटी इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, हे तिघेही रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.ही कारवाई रविवारी (१५ जानेवारी) रात्री ८:३० वाजता कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये प्रकरणी बाळू दगडू पवार (४३, रा. धामणे, ता. महाड, रायगड), संदीप काशिनाथ चव्हाण, (४७, रा. बारसगाव, ता. महाड, रायगड) व सीताराम गायकवाड (५३, रा. लोहारमाळ, ता. पोलादपूर, मूळ तुर्भे, ता. पोलादपूर) या तिघांचा समावेश आहे. खेडचे पोलिस उपनिरीक्षक सुजीत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रविवारी, महामार्गावर भरणे नाका येथील साई रिसॉर्टच्या जवळ रात्री संशयितरीत्या दोन दुचाकीवरून जात असताना थांबवून झडती घेतली.या झडतीत त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) मिळाली होती. पिशवीसह त्याचे वजन सुमारे १ किलो ८४ ग्रॅम इतके आहे. त्याची किंमत सुमारे १ काेटी इतकी आहे. या कारवाईत पाेलिसांनी एक टी. व्ही. एस कंपनीची (एमएच ०६, बी. झेड ४२७८) दुचाकी व एक होंडा कंपनीची (एमएच ०३, सीए ०६२५) क्रमांकाची दुचाकी, ओपो, सॅमसंग व विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. व्हेल माशाच्या उलटीशिवाय जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ७७,५०० रूपये इतकी आहे.
खेडमध्ये जप्त केलेली 'ती' माशाची उलटी तब्बल १ कोटीची, अटकेतील तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:16 PM