गुहागर : वाढलेल्या महागाईतून सरकारचा नाकर्तेपणा दिसत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून याचाच निषेध करताना जुन्या शिवसेनेतील जिवंतपणा उस्फूर्तपणे दिसला. एक वर्षानंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.सरकारच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटातर्फे गुहागर शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेतून त्यांनी सरकारविराेधात आसूड उगारले. ते म्हणाले की, भाजप म्हणजे सभ्य पक्ष. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अटल बिहारी वाजपेयी यांचा पक्ष म्हणून ओळख होती. आता हा पक्ष दृष्ट व गुंडांचा पक्ष झाला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये धर्मभेद पसरवून भाजप राजकारण करत असून, भाजपला दंगली घडवायच्या आहेत, असा आराेप भास्कर जाधव यांनी केला.उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या दीडशे कोटींच्या कामांना या सरकारने स्थगिती दिली. जाणीवपूर्वक विकासकामे रोखण्याचे काम सरकारने केल्याचे ते म्हणाले. सत्तेत आम्ही पण होतो पण कोणाच्या पोटावर कधी मारले नाही. हे सत्ताधारी लोकांच्या धंद्यावर उठले आहेत, त्यांना सोडणार नाही, असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, नेत्रा ठाकूर, तालुकाप्रमुख संदीप सावंत, चंद्रकांत चाळके, अशोक नलावडे, महेश नाटेकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भारत शेटे, विनायक मुळे, नवनीत ठाकूर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिकांवर टीकाज्यांच्या तोंडावरची माशी हलत नाही ते माझ्या विरोधात तक्रार करतात. यांची तोंडे फक्त लग्न व हळदी समारंभाला हलतात, असा टोला त्यांनी नाव न घेता विनय नातू यांना लगावला. तर, भाजपच्या केदार साठे यांचेही नाव घेत मंजूर कामाच्या कंत्राटदाराला आमच्या सरकारने निधी दिला आहे. आमच्याकडे पण बघा अशाकरिता फोन करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
महाराष्ट्रभर फिरणारशिवसेना आता संपेल असे सर्वांना वाटले होते. चाळीस आमदार फोडूनही शिवसेना वाढते आहे. नारायण राणे, रामदास कदम, उदय सामंत यांचा मला काही फरक पडत नाही. मी महाराष्ट्रभर पक्ष वाढीसाठी फिरणार आहे. आता तुम्ही सर्वांनी उद्धव पक्षाच्या वाढीसाठी लावणी लावा, असे आवाहन केले.